Skip to content

महाराष्ट्र पक्षिमित्रचे पुरस्कार (२०२५) जाहीर

पक्षीमित्र जीवन गौरव पुरस्कार श्री. गोविंद सबनीस यांना जाहीर.

अमरावती: गेली साडे चार दशके महाराष्ट्रात पक्षीविषयक कार्य करणारी संस्था “महाराष्ट्र पक्षिमित्र” तर्फे देण्यात येणाऱ्या २०२५ च्या पक्षिमित्र पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून, यावर्षीचा पक्षिमित्र जीवन गौरव पुरस्कार संभाजीनगर येथील डॉ. दिलीप दिवाकर यार्दी यांना जाहीर करण्यात आला.

  • इतर पुरस्कारांपैकी पक्षी संवर्धन व सुश्रुषा पुरस्कार अकोला येथील श्री. बाळ उर्फ जयदीप काळने यांना जाहीर करण्यात आला आहे.
  • पक्षी जनजागृती पुरस्कार वाशीम येथील श्री. मिलिंद सावदेकर यांना जाहीर करण्यात आला आहे.
  • पक्षी संशोधन पुरस्कार या गटातील पुरस्कार यावर्षी वरुड जि. अमरावती येथील श्री. प्रतिक चौधरी यांना जाहीर करण्यात आला आहे.
  • यावर्षीपासून नव्याने सुरुवात झालेला पहिला नवोदित पक्षिमित्र पुरस्कार साकोली जि. भंडारा येथील विकास बावनकुळे या नवोदित पक्षिमित्रास जाहीर करण्यात आला आहे.
  • पक्ष्यांवर सातत्याने लिखाण करणाऱ्यास दिला जाणारा पक्षी विषयक साहित्य पुरस्काराची घोषणा सुद्धा यावेळी करण्यात आली. यावर्षीचा पक्षी साहित्य पुरस्कार सांगली येथील जेष्ठ पक्षी व पक्ष्यांच्या आवाजाचे तज्ञ श्री. शरद आपटे यांना तसेच भाईंदर जि. ठाणे येथील डॉ. पराग नलावडे या दोन लेखकांना जाहीर करण्यात आला.

पक्षी सबंधित विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांचा गौरव व्हावा या उद्देशाने महाराष्ट्र पक्षिमित्र तर्फे २०१९ पासून या पुरस्कारांची सुरुवात करण्यात आली होती. सुरुवातीला यामध्ये दरवर्षी चार पुरस्कार देण्यात येत असत. आता ही  पुरस्कारांची संख्या एकूण सात इतकी झाली आहे.  या पुरस्कारांची घोषणा महाराष्ट्र पक्षिमित्र तर्फे अमरावती येथे संघटनेचे अध्यक्ष डॉ. जयंत वडतकर यांनी केली.

या पुरस्कारांचे वितरण दि. ०१ व २ नोव्हेंबर दरम्यान अमरावती येथे होणाऱ्या येत्या ३८ व्या महाराष्ट्र पक्षिमित्र संमेलनात करण्यात येणार आहे.

डॉ. दिलीप दिवाकर यार्दी

स्व. रमेश लाडखेडकर स्मृती जीवन गौरव पुरस्कार संभाजीनगर येथील जेष्ठ सभासद डॉ. दिलीप दिवाकर यार्दी यांना जाहीर करण्यात आला आहे. रोख रक्कम, मानपत्र आणि स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप असून हा पुरस्कार विदर्भ पक्षिमित्र मंच द्वारे डॉ. अनिल पिंपळापुरे यांचे तर्फे प्रायोजित करण्यात आलेला आहे.

श्री. प्रतिक चौधरी

स्व. डॉ. जी. एन. वानखेडे स्मृती पक्षी संशोधन पुरस्कार पक्षी अभ्यास, संशोधन, आणि त्यातून संवर्धन असे कार्य करणाऱ्या वरुड जि. अमरावती येथील श्री. प्रतिक चौधरी यांना जाहीर करण्यात आला आहे.

श्री. बाळ उर्फ जयदीप काळणे

नामदेवराव बहादुरे स्मृती पक्षी संवर्धन व सुश्रुषा हा पुरस्कार पक्षी संवर्धन, तथा जखमी पक्षी प्राणी उपचार आदी क्षेत्रात कार्यरत अकोला येथील मानद वन्यजीव रक्षक श्री. बाळ उर्फ जयदीप काळणे यांना जाहीर करण्यात आला. हा पुरस्कार नागपूर येथील महाराष्ट्र पक्षिमित्रचे सदस्य श्री. अनिल बहादुरे यांचे तर्फे प्रायोजित करण्यात आला आहे.

श्री. मिलिंद सावदेकर

स्व. रामभाऊ शिरोडे (वाणी) स्मृती पक्षी जनजागृती पुरस्कार पक्षी अभ्यास, नोंदणी, सर्वेक्षण आणि पक्षी विषयक जनजागृती आदी क्षेत्रात कार्यरत वाशीम येथील श्री. मिलिंद सावदेकर यांना यांना जाहीर करण्यात आला आहे. हा पुरस्कार श्री. अविनाश शिरोडे, नाशिक यांचे तर्फे प्रायोजित करण्यात आलेला आहे.

विकास बावनकुळे

या वर्षीपासून नव्याने सुरु करण्यात आलेला स्व. प्रकाशसिंह नारायणसिंह मोरे स्मृती उदयोन्मुख पक्षिमित्र पुरस्कार शाळा महाविद्यालयात शिकणारे विद्यार्थी पक्षीमित्रास हा पुरस्कार देण्यात येत असतो. यावर्षीचा हा पुरस्कार साकोली जि. भंडारा येथील विकास बावनकुळे या नवोदित पक्षिमित्रास जाहीर करण्यात आला आहे. हा पुरस्कार महाराष्ट्र पक्षिमित्रचे सदस्य श्री. किरण मोरे यांचे तर्फे प्रायोजित करण्यात आला आहे.   

“पक्षी” या विषयावर सातत्याने लेखन करणाऱ्या साहित्यिक, लेखकांसाठी देण्यात येणारा – श्रीमती सुशीला पाटकर स्मृती पक्षी साहित्य पुरस्कार यावर्षी दोन लेखकांना देण्यात आला आहे.
हा पुरस्कार ॲड. चंदना साळगावकर, मुंबई यांचे तर्फे प्रायोजित करण्यात आलेला आहे.

श्री. शरद आपटे
  1. सांगली येथील जेष्ठ पक्षी व पक्ष्यांच्या आवाजाचे तज्ञ श्री. शरद आपटे यांना त्यांच्या “कोतवाल” आणि “पक्षिगान- का?कोठे?केव्हा?” या दोन पुस्तकांसाठी पक्षी साहित्य पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
डॉ. पराग नलावडे

2. भाईंदर जि. ठाणे येथील “जावे किंगफिशरच्या गावा” या पुस्तकाचे लेखक डॉ. पराग नलावडे यांना पक्षी साहित्य पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. 

कुमार अर्पित अक्षय चौधरी

दरवर्षी पक्षिमित्र संमेलनाच्या आयोजकांकडून निवड करून नवोदित पक्षिमित्रास दिला जाणारा स्व विनोद दिगंबर गाडगीळ पुरस्कार यावर्षी आयोजकांकडून याच वेळी जाहीर करण्यात आला असून हा पुरस्कार इयत्ता दुसरीत शिकणाऱ्या कुमार अर्पित अक्षय चौधरी या बालकास जाहीर करण्यात आला आहे.